नागपूर - सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटला नसला तरी नागपुरात मात्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. विधिमंडळाच्या इमारतींची डागडुजी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी रंग-रंगोटीच्या कामाला वेग आला आहे.
सत्ता संघर्ष दिल्लीत प्रलंबित, नागपुरात मात्र हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात
सत्ता स्थापनेचा तिढा अजुनही सुटला नसला तरी नागपुरात मात्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. सत्ता स्थापनेनंतर हिवाळी अधीवेशनाची अधिकृत तारीख जाहीर होणार आहे.
राज्यात सत्ता कुणाची हा प्रश्न अनुउत्तरीत असल्याने प्रत्येकाला या बाबत उत्सुकता आहे. नियमानुसार राज्यात सत्ता स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनाची अधिकृतपणे तारीख जाहीर होईल. नोव्हेंबर महिना अर्ध्यापेक्षा जास्त लोटला असूनदेखील सत्ता स्थापनेचा योग जुळून येत नसल्याने साधारणतः डिसेंबर महिन्यात होणारे अधिवेशन, या वर्षी होणार का नाही, या संदर्भात अस्पष्टता आहे.
हिवाळी अधिवेशनाचा सर्व कार्यक्रम अधांतरी असला तरी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या बाजूला नव्याने तयार केल्या जात असलेल्या इमारतीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच एक अधिवेशन उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूरला घेण्यात येते. विदर्भातील प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याच्या हेतूने हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची परंपरा आहे.