नागपूर - बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस, गोरख मठाचे महंत अवैधनाथ या नेत्यांचे राम मंदिर आंदोलनातील योगदान मोठे आहे. यामुळे या मोठ्या नेत्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष परिषदेचे अध्यक्ष डॉ प्रवीण तोगडिया यांनी केली. ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया
बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस, गोरख मठाचे महंत अवैधनाथ या नेत्यांना भारतरत्न देण्याची मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली. ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करायला जेव्हा कुणी तयार नव्हते तेव्हा या नेत्यांनी नेतृत्व केले. या व्यक्तींना भारत सरकारने भारतरत्न द्यावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली. सोबतच राम मंदिर उभारणीत शेकडो राम भक्तांचे रक्त व हजारो राम भक्तांच्या घामाचे श्रेय आहे. त्यामुळे सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अयोध्येतील राम मंदिर परिसरात बलिदान देणाऱ्या रामभक्ताचे स्मारक बनवण्याची मागणीही तोगडिया यांनी केली. भाजप जेव्हा एकटा पक्ष होता त्यावेळी केवळ शिवसेना त्यांच्यासोबत उभी होती. लहान भावाला मुख्यमंत्रीपद दिल्याने भाजप काही लहान झाला नसता, असेही प्रवीण तोगडिया यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे लढतात मग ते कुठल्याही पक्षाचे नेते असोत, त्यांना माझे समर्थन असल्याचे प्रवीण तोगडिया म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचे कार्य करीत असल्याने माझे त्यांना समर्थन असल्याचे प्रवीण तोगडिया म्हणाले.