नागपूर - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. पण, ते एकटे नाही तर सेनेतील 90 टक्के आमदार आणि खासदार हे सध्याच्या परिस्थितीत अस्वस्थ झाले आहेत. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याने तयार झालेली अस्वस्थता पत्रातून समोर आल्याचा दावा राज्याचे माजी मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केला.
हेही वाचा -ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत सरकारने निवडणुका घेऊ नये - विजय वडेट्टीवार
शिवसेनेत अंतर्गत धुसफूस
राज्यात निवडणुका होत असताना देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा दाखवून आमदार निवडून आणले. मोदी यांचा चेहरा समोर करून खासदार निवडून आणले. निवडणुकीच्या काळात प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे अनेकदा बोलूनही दाखवले. मात्र, नंतर पाठीत खंजीर खुपसला. या बेईमानीमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे परिणाम म्हणून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू झाली. ती काशी थांबवावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आला आहे. यामुळे अजूनही वेळ गेली नाही, शिवसेनेने याचा विचार करावा, असे बावनकुळे म्हणाले.