नागपूर- नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात रात्री उशिरा हवाला व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या तीन पथकांनी एकाच वेळी धाडी टाकत तब्बल 4 कोटी 2 लाखांची रोकड जप्त केली आहे. नेहल सुरेश वडालिया, वर्धमान विलासभाई पच्चीकर आणि शिवकुमार हरिश्चंद दिवानीवाल यांच्यावर पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांना मोठं घबाड हाती लागल्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आणि सहायक पोलीस आयुक्त सुर्वे यांच्या नेतृत्वात तीन पथकांनी धाड टाकण्याची कारवाई केली.
नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल परिसरातील रेणुका माता मंदिर शेजारी असलेल्या एका अपार्टमेंट मध्ये हवालाची मोठी रक्कम आली असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. माहितीची सत्यता पटवल्यानंतर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी तीन पथकांचे गठन केले. पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्या अपार्टमेंटवर छापा टाकून हवालाचे तब्बल 4 कोटी 2 लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा नेहल सुरेश वडालिया, वर्धमान विलासभाई पच्चीकर आणि शिवकुमार हरिश्चंद दिवानीवाल हे हवाला व्यावसायिक त्याठिकाणी उपस्थित होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.