नागपूर -नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी झिंगाबाई टाकळी येथील निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या त्यांचा घटनास्थळीच झाला मृत्यू
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा प्रमोद हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे रवाना करून तपास सुरू केला आहे.
आजारपणाला कंटाळून केली आत्महत्या!
प्रमोद यांना काही महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. उपचारानंतर त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना काळी बुरशी (ब्लॅक फंगस) च्या आजाराने ग्रासले होते. उपचारानंतरसुद्धा प्रमोद यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. तर दुसरा डोळा 80% खराब झाला होता. आजारपणामुळे प्रमोद हे मागील काही दिवसापासून वैद्यकीय रजेवर होते. आजारपणाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -'तालिबानी' शिक्षा! वडील आणि भावाकडून तरुणीला काठीने बेदम मारहाण