नागपूर -संचारबंदी दरम्यान हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ विकण्याला परवानगी नाकारण्यात आली असताना देखील नागपुरातील काही हॉटेल्सकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचं आढळून येतात. नागपूर शहर पोलीस दलाच्या उपायुक्त विनिता साहू यांनी सदर परिसरातील दोन हॉटल्सवर कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन्ही हॉटेल्स सील केले असल्याची माहिती डीसीपी विनिता साहू यांनी दिली आहे.
हेही वाचा -नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पोलीस आयुक्तांचा इशारा
नागपूर शहरात कोरोनाचा प्रतिबंधक कमी व्हावा या करिता संचारबंदी अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत एक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सोबतच शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हॉटल्स आणि रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड डिलिव्हरी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरी देखील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूनम चेंबर या इमारतीत असलेल्या डोमिनोज आणि मॅक डोनाल्ड या दोन्ही हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून सर्व्हिस दिली जात होती. या पार्श्वभूमीवर डीपीपी विनिता साहू यांनी दोन्ही हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.