नागपूर - पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच अमितेशकुमार यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. नागपूर पोलीस नागारिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. मात्र हे करत असताना नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. शहरात कायदा सुवव्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्याला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.
गुन्हेगारी घटनांच्या बाबतीत नागपूरने राज्यातील इतर शहरांना मागे टाकले आहे. सातत्याने वाढत्या खुनाच्या घटनांसाठी नागपूर शहर नेहमीच चर्चेत आहे. खुनाच्या घटना रोखण्यासाठी शहर पोलीस प्रयत्नशील आहेत. या बाबतीत ठोस उपाययोजना केल्या जात आल्याचं ते म्हणाले. शहरात भूमाफियांचा देखील सुळसुळाट आहे. त्यांना आळा घातला जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.
वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा
नागपूर शहराचा विस्तार लक्षात घेता वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसतच नसल्याने रॅश ड्रायव्हिंग, सिग्नल जम्पिंगसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे वाहन जप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन रणनीती नाही
क्राइम कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नागपुरात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर अनेक वर्षांपासून चिंता व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळेच नागपुरातील गुन्ह्यांचा आलेख खाली आल्याचं सांगताना पोलीस आयुक्तांनी गुन्हे नियंत्रणासाठी नवीन रणनिती सद्यातरी नसल्याचे सांगितले आहे. अनेक गुन्हेगार न्यायालयाने दिलेल्या तारखेवर हजर राहत नाहीत. अशांना जमीन देऊ नये, अशी आग्रहाची विनंती न्यायालयाला करणार असल्याचे ते म्हणाले.