नागपूर - सेक्सटॉर्शनसाठी पत्नीचा ( use of wife for sexual abuse ) वापर करुन अधिकाऱ्याकडून एक कोटीची खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमित सोनी असे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून तो छत्तीसगडमधील राजनांदगावचा रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला 28 लाख रुपयाचा पहिला हप्ता घेताना सदर परिसरातील एका हॉटेलमधून रंगेहात पकडले आहे.
अधिकाऱ्याने महिलेला पाठवले अश्लील छायाचित्र -शहरातील एक अधिकारी अमित सोनी आणि त्याच्या पत्नीला ओळखतात. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांची आरोपी अमितच्या पत्नीसोबत चॅट सुरू होती. यावेळी आरोपी अमित आणि त्याच्या पत्नीने पीडित अधिकाऱ्याला अश्लील छायाचित्रे आणि मॅसेज पाठविले. त्यानंतर त्या पीडित अधिकाऱ्यालाही अशाच प्रकारची छायाचित्रे आणि चित्रफीत पाठविण्यासाठी बाध्य केल्याचा अधिकाऱ्याचा दावा आहे. त्या अधिकाऱ्याने स्वतःचे काही अश्लील छायाचित्र महिलेच्या मोबाईलवर पाठवले होते.
१ कोटीची केली मागणी - अधिकारी आपल्या जाळ्यात अडकल्याची खात्री पटल्यानंतर अमितने त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. तुमची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफीत आमच्याकडे असून ती तुमच्या नातेवाइकांमध्ये व्हायरल करू अशी धमकी त्याने अधिकाऱ्याला दिली. ती व्हायरल न करण्यासाठी एक कोटीची खंडणीही मागितली. मात्र खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार ऐकून अधिकारी चक्रावून गेला.