नागपूर - सराफा व्यापाऱ्याचे 60 लाखाचे दागिने लुटल्याची घटना शनिवारी पाचपावलीच्या पुलावर घडली होती. केतन बटूकभाई कामदार असे त्या लूट झालेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात लुटारुंनी केतन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पोटात चाकूचे वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान 60 लाखाचे दागिने लुटीनंतर पोलीस आयुक्तांनी आपल्या पथकाला तपासाबाबत योग्य तो 'कानमंत्र' दिला. त्यामुळे 20 तासातच पोलीस पथकाने 6 लुटारुंच्या मुसक्या आवळून 60 लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
पाचपावली पुलावर अशी घडली लुटीची घटना -नागपूर शहरातील सराफा लाईनमध्ये केतन यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. शनिवारी केतन हे आपल्या दुचाकीने पाचपावली परिसरात सॅम्पल ग्राहकाला दाखवायला गेले होते. सॅम्पल दाखवून परत येताना पाचपावली पुलावर अज्ञात तरुणाने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, त्यानंतर आणखी एका आरोपीने त्यांच्यावर चाकुने वार केल्यामुळे केतन गंभीर जखमी झाले. जखमी केतन यांच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन लुटारुंनी घटनास्थळावरुन पोबारा केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीच्या खळबळजनक घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. जखमी केतन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांनी 20 तासात आवळल्या लुटारुंच्या मुसक्या -पाचपावली पुलावर केतन कामदार या सराफा व्यापाऱ्याला लुटून लुटारुंनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले. दिवसाढवळ्या लुटीची घटना घडल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पथकाला सतर्क करत वायरलेसवर आरोपींच्या मुसक्या आवळण्याबाबत कानमंत्र दिला. त्यामुळे पोलीस दलातील जवानांनी या लुटारुंच्या 20 तासात मुसक्या आवळल्या. पथकातील जवानांनी चोख कामगिरी पार पाडल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोहिमेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार लाख रुपयांचे रोख रिवार्ड जाहीर केले आहे.
घटनेचा छडा लावण्यासाठी 200 तासांचे सीसीटीव्ही फुटेज केले चेक -सराफा व्यापारी केतन कामदार यांना लुटल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी अगदी वायू वेगाने तपासाला सुरुवात केली. तक्रारदार केतन हे गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळासह केतन ज्या ज्या ठिकाणी गेले, अश्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यावर काम सुरू केले. सुमारे दोनशे तासांची रेकॉर्डिंग तपासल्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध लागला. त्यानंतर सहा आरोपींना अटक करून पोलिसांनी 60 ते 70 लाख रुपये किमतीचे 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
सराफा व्यापाऱ्यांनी केला पोलीस आयुक्तांचा सत्कार -सराफा व्यापारी केतन कामदार यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांच्याकडील लाखो रुपयांचे दागिने आरोपींनी लुटले. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली. मात्र पोलीस दलाच्या तात्काळ कारवाईने या घटनेतील आरोपींचा छडा लागला. पोलिसांनी या लुटीतील अकराशे ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी केलेली कामगिरी धडाकेबाज असल्याने नागपूर सराफा व्यापारी असोसिएशनकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सत्कार करण्यात आला.