नागपूर- शहरातील एका भागात व्यक्तीने आपल्याच नातेवाईक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नात्याने आरोपी हा पीडित महिलेचा सासरा आहे. पी. रमेश (वय ५८) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार महिलेच्या घरी कुणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन या नराधमाने तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केला. मात्र, त्यानंतर आरोपी पळून गेला होता. घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या तक्रारींनुसार पीडित महिला आणि आरोपी अगदी शेजारी राहतात. आरोपी हा त्या महिलेच्या नवऱ्याच्या आत्याचे यजमान आहेत. तक्रारदार महिलेचा पती हा ट्रक ड्राईव्ह असल्याने ते अनके दिवस घराबाहेर राहायचे, त्यावेळी आरोपी हा कोणतेही काम नसताना त्यांच्या घरी ये-जा करायचा. त्याचा 'ट्रान्सपोर्ट'चा व्यवसाय आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आरोपीची पत्नीही बाहेर गावी गेल्याने तिने आरोपीच्या जेवणाची सोय पीडित महिलेकडे केली होती. याच संधीचा गैरफायदा घेऊन घरात कुणी नसताना आरोपीने महिलेवर बलात्कार केला. आरोपीने तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर तिने सर्व घटनाक्रम त्यांना सांगितला असता त्यानंतर आरोपीविरुद्ध कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली.