नागपूर - १६ जानेवारी पासून संपूर्ण देशात कोरोना विषाणूंना प्रतिबंध घालणाऱ्या लसीकरणाची पहिल्या टप्प्यातील मोहीम सुरू झाली आहे. सुरवातीला लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोरोनाचे रुग्ण अचानक वाढू लागल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सुरवातीला केवल ४० टक्यांपर्यंत लसीकरण झाले असताना आता मात्र ही टक्केवारी ५६ टक्के इतकी झाली आहे. येत्या काळात ही टक्केवारी आणखी वाढणार आल्याचे जाणकार सांगत आहेत.
२०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनामुळे वाया गेले आहे. कोरोनाच्या दहशतीखाली जगताना संपूर्ण जगाला कोरोना प्रतिबंधक लसीचा उत्सुकता होती. मात्र, ज्यावेळी प्रत्यक्षात लस अस्तित्वात आल्यानंतर लसीकरणाची मोहीम सुरू झाली, त्यावेळी लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजातून अनेकांनी लस घेणे टाळले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. आता कोरोनाचा प्रभाव ओसरला आहे. त्यामुळे लस घेण्याची गरज काय, लस घेतल्यानंतर काही अपाय होतात अश्या प्रकारचा मतप्रवाह लाभार्थ्यांमध्ये वाहत होता. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून परत रुग्ण संख्या वाढीस लागल्यानंतर आता ज्या लाभार्थ्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केली होती, ते देखील आता लसीकरणासाठी पुढे येत असल्याची माहिती आहे. यामुळे सुरवातीला रोडवलेली लसीकरणाची टक्केवारी आता ५६ टक्यांपर्यंत पोहचली आहे.