नागपूर - नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही प्रवाशांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. इंडिगो विमानाने मुंबईला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांकडे कोरोना चाचणी अहवाल नसल्याने त्यांना प्रवासासाठी रोखण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी गोंधळ घातला.
कोणतीही पूर्व कल्पना न देता प्रवास करण्यापूर्वी इंडिगो प्रशासनाकडून ऐनवेळी प्रवाशांकडे आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह अहवाल मागितला. मात्र, तशी सूचना आधी मिळाली नसल्याने अनेकांकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट नसल्याने प्रवाशांना प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.
इतरांना ही सक्ती का नाही -
राज्यातल्या राज्यात प्रवास करताना कोरोना चाचणीचा अहवाल यापूर्वी मागितला जात नव्हता. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवणे गरजेचे झाले असल्याचे कारण देत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना रोखण्यात आल्याचे प्रवासी अजय दवांगले यांनी सांगितले. मुंबईला विमानाने जात असताना कोरोना निगेटिव्ह चाचणीचा अहवाल देणे गरजेचे आहे, तर मग कार आणि इतर मार्गांनी प्रवास करणाऱ्यांना ही सक्ती का केली जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.