नागपूर - हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऑटो चालकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनिल बर्वे असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. ऑटो चालकाचा खून हा ऑटोतील प्रवासी असलेल्या एका दाम्पत्याने केल्याचा खुलासा झाला आहे. ऑटोच्या भाड्यावरून वाद झाला,ज्यामध्ये नवरा बायकोने संगनमत करून अनिल बर्वेचा दगडाने ठेचून खून केला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाच्या आरोपीखाली अनंतराम लखन रजत आणि अनिता लखन यांना अटक केली आहे. आरोपी दाम्पत्य हे मध्यप्रदेशच्या सागर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरू केला वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्य हे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. ते कामाचा शोध घेत घेत नागपूरला आले होते. या दरम्यान त्यांना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी येथील आऊटर रिंग रोड परिसरात असलेल्या एका टाइल्स कंपनीत काम मिळाले. कामाच्या ठिकाणी सर्व बिराड घेऊन जायचे असल्याने त्यांनी ऑटो-रिक्षा केला. त्याकरिता २०० रुपयांचे भाडे निश्चित करण्यात आले होते. ऑटो चालक अनिल बर्वे हे लखन दाम्पत्याला घेऊन नियोजित स्थळी गेल्यानंतर ऑटो रिक्षा चालकाने आपले लखन दाम्पत्याकडे भाडे मागितले, तेव्हा दोनशे रुपये जास्त होतात, असे म्हणत त्यांनी वाद सुरू केला.
तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींना अटक
काही वेळातच त्यांच्यात हाणामारी झाली, त्याचवेळी आरोपी अनंतराम लखन आणि अनिता लखन यांनी ऑटोचालक अनिल बर्वेच्या डोक्यावर दगडाने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी दाम्पत्य दुसऱ्या साइटवर पळून गेले होते, मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांनाही अटक केली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींना अटक ऑटोचालक बर्वे यांचा खून केल्यानंतर आरोपी लखन दाम्पत्य घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान घटना ही सामसूम ठिकाणी घडल्याने आरोपींचा शोध घेणे कठीण झाले असताना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींना अटक केली आहे.