नागपूर -नागपूर परिसरातील जयताळा भागातील एका पेंटरची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण (Brutal murder) हत्या करण्यात आली.राहुल खोरगडे (Rahul Khorgade) वय (२७) वर्ष असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा दारूच्या नशेत रोज परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी द्यायचा, त्याचं वादातून परिसरात राहणाऱ्या सतीश शेषलाल उसबर्ग वय (२२) वर्ष याने राहुलची हत्या केल्याचं निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
अशी घडली घटना - मृत राहुल गुलाबराव खोरगडे हा पेंटिंगचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होेते. राहुल हा भाऊचा धक्का हॉटेल शेजारी एका झोपडीत राहत होता,तर त्याचे कुटुंबीय त्याच परिसरात राहायचे. राहुल सदैव दारूच्या नशेत राहायचा आणि वस्तीतील नागरिकांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. दोन दिवसांपूर्वी राहूलने वस्तीत राहणाऱ्या सतीश उसबर्ग यांच्या आई वडिलांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे संतापलेल्या सतीशने रात्री उशिरा कुऱ्हाडीने राहुलची निर्घृण हत्या केली.
काही तासात आरोपी सतीशला अटक -सकाळी राहुलची आई त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीत गेली आता तिथे राहुलचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजतास पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासात आरोपी सतीश उसबर्गला अटक केले. तर या घटनेमुळे जयताळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.