नागपूर - नागपूर शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर तर पहिल्या दिवसापासूनच ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत आहे. मात्र व्यवस्था अपुरी पडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होताना दिसून येत आहे.
लाऊडस्पीकरवरून विनंती
गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण सेंटरवर गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडवला आहे. लसीकरण केंद्रावर बसायची जेवढी व्यवस्था आहे ती अपुरी पडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना केंद्राबाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे. लसीकरण केंद्राबाहेर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना टोकन देण्यात येत असून दोन दिवसांनी येण्यास सांगण्यात येत आहे. तरीदेखील ज्येष्ठ नागरिक रुग्णालयाच्या बाहेर गेटच्या बाहेर मोठी रांग करून उन्हात बसलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे आता ज्येष्ठ नागरिकांना लाऊडस्पीकरवरून विनंती केली जात आहे.