नागपूर -विदर्भात मान्सून दाखल झाल्याची घोषणा कालच प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आली होती. त्याचवेळी येत्या काळात नागपूरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील दिला होता. त्यानुसार आता प्रशासनाने देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑरेंज अलर्ट! हवामान खात्याचा नागपूरला सतर्कतेचा इशारा '11 ते 14 जूनदरम्यान पावसाची शक्यता'
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागपूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दिनांक ११ जून ते १४ जून या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व एक-दोन ठिकाणी वादळीवाऱ्यासह वीजा पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्याजवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
'शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी'
मुसळधार पाऊस सुरू असताना विज पडण्याचा धोका असल्यामुळे झाडाखाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक शेताची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी. नदी किंवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा- Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार