नागपूर- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर नागपुरात बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधीपक्ष नेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचल्याची टीका करत, त्यांना गुजरात आणि यूपीतील परिस्थिती दिसत नाही का? असा सवाल केला. ते नागपुरात बचत भवन येथे खरिप आढावा दरम्यान पत्रकार परिषदेत बोलत होते.
'गुजरातमध्ये आकडे लपवले जातात'
"गुजरातमध्ये आकडे लपवले जात आहे. उत्तर प्रदेशात भाजप सरकार असलेल्या राज्यात भाजपच्या आमदाराच्या पत्नीला बेड मिळत नाही. आमदार अश्रू ढाळतोय. मृत देहाचे सडे पडले आहे, हे चित्र विरोधीपक्ष नेत्यांना दिसत नाही का? महाराष्ट्रात कुठलेच आकडे लपवण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात नसून, सर्व पारदर्शक पद्धतीचे काम आहे. महाराष्ट्रात ज्या प्रमाणात चाचण्या केल्या गेल्यात, त्या कुठल्याही राज्यात झालेल्या नाहीत. भाजप शासित राज्यात आकडे लपवण्याचे पाप केले जात आहे. महाराष्ट्राने अधिक चाचण्या केल्यामुळे रुग्ण दिसत आहे. कोरोनाबाधित मृतांचे आकडे लपवून काय मिळणार आहे", असे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत म्हणाले.