नागपूर - फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी कोट्यवधी रुपयांचे प्लायवूड लागणार असल्याने त्याकरिता टेंडर भरण्यासाठी दोन लाख ६५ हजार रुपये भरावे लागतील, अशा आशयाचा मेल नागपूरचे व्यापारी प्रशांत नायडू यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कोणतीही शहानिशा न करता थेट रक्कम दिलेल्या खात्यात जमा केली. त्यानंतर मात्र पुन्हा पैशाची मागणी झाल्यानंतर नायडू यांना संशय आल्यानंतर त्यांनी या संदर्भात चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.
कंपनीच अस्तित्वात नाही
या प्रकरणातील तक्रारदार प्रशांत मुरलीधर नायडू हे प्लायवूडचे व्यापारी आहेत. नायडू यांना फेब्रुवारी महिन्यात राजू एंटरप्राइजेसच्या नावावे एक मेल प्राप्त झाला होता. यंदाचा फिफा वर्ल्ड कप कतार येथे होणार असल्याने त्या करिता स्टेडियमचे निर्माण कार्य सुरू आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात प्लायवूड लागणार असल्याने अनेक ठिकाणावरून टेंडर मागवण्यात आले आहेत. त्याकरिता तुम्हाला २ लाख ६५ हजार रुपये भरावे लागतील. त्यानंतर नायडू यांनी या संदर्भात कुणाकडे सुद्धा चौकशी करण्याची त्यावेळी तसदी घेतली नाही. या नंतर पुन्हा राजू एंटरप्राइजेसकडून पैशाची मागणी करण्यात आल्यानंतर तक्रारदार नायडू यांनी या संदर्भात चौकशी करायला सुरुवात केली. त्यांनी कतार उच्चायुक्त कार्यालयात या कंपनी संदर्भात चौकशी केली, तेव्हा या नावाची कंपनी अस्तित्वात नसल्याची माहिती समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर नायडू यांनी थेट सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून राजू एंटरप्राइजेसच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या फसवणुकीच्या प्रकारामागे कोण आहे, याचा शोध पोलिसांनी सुरू केला असून मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
सायबर सेलकडून जनजागृती करण्याची गरज
उपराजधानी नागपुरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना या सत्यत्याने घडत आहेत. शिवाय आर्थिक फसवणुकीचे प्रकारदेखील वाढत असल्यानेच गुन्हे शाखेत आर्थिक फसवणूक (EOW) संदर्भात शाखा कार्यरत आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपूर्वी सायबर सेलदेखील सुरू करण्यात आले आहे. मात्र सायबर सेलकडून ऑनलाइन आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, याकरिता जनजागृती करण्याची गरज आहे. मात्र ते होत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे.