महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर : मॅट्रिमोनिअल साईटवर महिलांशी सलगी करून लुटणारा ठग जेरबंद

मॅट्रिमोनिअल साईट्सच्या आधारे महिलांशी सलगी करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू पळवणाऱ्या ठगाला पोलिसांनी मध्यप्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत.

nagpur crime news
नागपूर : मॅट्रिमोनिअल साईटवर महिलांशी सलगी करून लुटणारा ठग जेरबंद

By

Published : Dec 7, 2020, 8:07 PM IST

नागपूर -गडगंज श्रीमंत असल्याचा बनाव करून मॅट्रिमोनिअल साईट्सवर वराच्या (नवरा मुलगा) महिला आणि तरुणींशी ओळख करून त्यांना लुटणाऱ्या ठगाला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मोठ्या शहरांमध्ये असलेल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये या तरुणींना भेटायला बोलवायचा. यातून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर जवळील मौल्यवान वस्तू लंपास करून तो फरार होत होता. संबंधित आरोपीला नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील आमला येथून अटक केली आहे. मिक्की सिंग जगजीत सहानी(वय - ३८) असे त्याचे नाव आहे. नागपूर पोलिसांनी त्याच्या जवळून १ लाख ८३ हजारांच्या रोखीसह तब्बल ७ लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला या कामात मदत केल्याप्रकरणी आनंद शाहू (वय - ३०) नावाच्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे.

नागपूर : मॅट्रिमोनिअल साईटवर महिलांशी सलगी करून लुटणारा ठग जेरबंद

मिक्की सिंग जगजीत सहानी हा जीवनसाथी डॉट कॉम, शादी डॉट कॉम यासारख्या मॅट्रिमोनिअल साईट्स वर रींपी खंडूसा आणि रोमि अरोरा या दोन खोट्या नावांनी सक्रिय आहे. नवऱ्या मुलाच्या शोधात असलेल्या महिलांना आणि तरुणींना हेरून त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी आरोपी श्रीमंतीचा बनाव करत होता. त्याने मॅट्रिमोनिअल साईटवर स्वत:चे आकर्षक खोटे प्रोफाइल अपलोड केले होते. त्याआधारे तो पीडितांना आपल्या जाळ्यात अलगद ओढायचा. त्यांच्या सोबत मैत्री केल्यानंतर मोठ्या शहरात असलेल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये भेटायला बोलवायचा. त्याठिकाणी दोघांनी काही वेळ घालवल्यानंतर तरुणीचा विश्वास संपादन करून संधी मिळताच मौल्यवान वस्तू चोरून पोबारा करायचा. मागील काही दिवसांमध्ये अशा प्रकारचे दोन गुन्हे घडल्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशच्या बैतुल येथून अटक केली आहे.

...अखेर सापडला मिक्कीसिंग

आरोपी मिक्की सिंग जगजीत सहानी याने रींपी खंडूसा आणि रोमि अरोरा या नावाने दोन तरुणींना नागपुरात बोलावून लुटले होते. या संदर्भांत गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला. सुरुवातीला हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी आरोपी भाड्याच्या टॅक्सीतून बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी कॅबचा नंबर शोधून काढला. त्यानंतर कॅबची बुकिंग करणाऱ्या ग्राहकाचा मोबाइल नंबर मिळवला. त्याच्या आधारे आरोपीचे लोकेशन मिळवून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

उच्चशिक्षित आरोपीने लढवली शक्कल

मिक्की सिंग जगजीत सहानी नामक आरोपी हा उच्चशिक्षित आहे. त्याच्या कुटुंबातील बहुतांश नातेवाईक हे देशाबाहेर वास्तव्यास आहेत. हा आरोपी बैतुल येथे आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असून त्याने नागपूर, जबलपूरसह देशातील अन्य शहरात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी आरोपीने ही शक्कल लढवल्याचे तपासात उघड झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details