नागपूर - शहर पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने साडे पाच लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. संबंधित कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा भाचा विकास उर्फ सनी वर्मा आणि त्याचे मुंबईतील साथीदार बरकत अली निसार खान, सिराज अब्दुल सत्तार खान आणि शेख अकबर अली शौकत अली यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींच्या जवळून 182.26 ग्रॅम एम.डी.पावडर व इतर मुद्देमाल असा एकूण १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा भाचा सनी वर्मा गजाआड; ड्रग्ससह चौघे ताब्यात
शहर पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने साडे पाच लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. संबंधित कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाला सराईत गुन्हेगार सनी वर्मा हा मुंबईतून अमरावती मार्गे मोठ्या प्रमाणात एम.डी. पावडर आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यासोबत काही साथीदार असल्याचेही कळले. संबंधित माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रिंग रोडवरील वाडी नवीन काटोल नाक्यावर सापळा रचला.
ज्या वाहनाची माहिती पोलिसांना मिळाली होती, ती कार अमरावती मार्गाने नागपूर शहराकडे येताना दिसताच पथकाने हे वाहन आडवले. कारमध्ये सराईत गुन्हेगार विकास उर्फ सनी राजकुमार वर्मा, बरकत अली निसार खान,शेख अकबर अली शौकत अली आणि सिराज अब्दुल सत्तार खान असे चार आरोपी सापडले. पोलिसांनी या चारचाकीची झडती घेतल्यानंतर त्यांना मोठा ड्रग्सचा साठा सापडला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून कारवाई केली आहे.