नागपूर - ज्या पद्धतीने शहरे वाढत चालली आहेत. त्याच पद्धतीने वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. ही वाढती वाहनांची संख्या आणि आधुनिकीकरणाच्या प्रणालीचा सर्वात मोठा फटका बसतोय, तो म्हणजे पक्षी आणि प्राण्यांना! नागपूर शहरात गेल्या काही महिन्यात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर झाला आहे. अशावेळी नियमित दिसणारे पक्षीच नामशेष होत असल्याची माहिती पक्षी तज्ञांनी दिली आहे. तसेच येणाऱ्या काळात ध्वनी प्रदुषण कमी न झाल्यास तुरळक प्रमाणात दिसणारे पक्षी व प्राणी देखील नामशेष होण्याची भीती अभ्यासकांनी वर्तवली आहे.
पक्षी होत आहेत नामशेष... ध्वनी प्रदुषणावर वेळीच नियंत्रणाची गरज - noise pollution in nagpur
नागपूर शहरात गेल्या काही महिन्यात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. याचा थेट परिणाम वाढत्या प्रदुषणावर झाला आहे. अशावेळी नियमित दिसणारे पक्षीच नामशेष होत असल्याची माहिती पक्षी तज्ञांनी दिली आहे.

आधुनिकीकरणाचा परिणाम?
आधुनिकीकरणाचा माणसाला फायदा होतोय. प्रत्येक व्यक्ती आनंदमय जीवनशैली अनुभवण्यासाठी धडपड करतोय. मोठ मोठे बंगले, आलीशान गाड्या हे उभारण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातांना दिसून येत आहे. अशावेळी आधुनिकीकरणाच्या दुनियेत सुखात्मक स्वप्न रंगविण्यासाठी निसर्गाला आणि त्यातील घटकांना ध्वनी प्रदुषण मारक ठरत आहे.
ध्वनी प्रदुषणात वाढ व नामशेष पक्षी
अलीकडच्या काळात शहरातील ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे पहायला मिळत आहे. मोठ मोठ्या गाड्यांचा कर्णकर्कश आवाज शहरातील प्राणी व पक्षीसाठी घातक ठरलाय. वाढत्या ध्वनी प्रदुषणामुळे नियमीत दिसणारे पक्षीच आज नामशेष होत असल्याचे चित्र आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात झाडे पहायला मिळतात. परंतु ही झाडं वाढत्या ध्वनी प्रदुषणामुळे पक्ष्यांविनाच आहेत. एकेकाळी सतत किलबिलाट होणाऱ्या या झाडावर आता शुकशूकाट आहे.
अशावेळी नामशेष होत असलेल्या चिमणी, कावळा या प्रजातींना शहरात नियमित पाहायचे असेल तर माणसांनी ध्वनी प्रदुषणाच्या दुष्परिणामाला लवकर समजून जागे होण्याची गरज आहे. त्यामुळे शहरात पुन्हा पक्षांचा व प्राण्यांचा वास्तव अनुभवण्यासाठी ध्वनी प्रदुषण कमी करणे हाच एक उपाय असल्याचे एकंदरीतच स्थितीवरून लक्षात येते.