नागपूर - शहरातील लोकमान्य नगर ते सीताबर्डी मार्ग या मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे 'माझी मेट्रो' या नागपूर मेट्रोच्या ११ किलोमीटर मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, यावेळी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी भाषणा दरम्यान बोलून दाखवली.
नागपूर महामेट्रोच्या मार्गिकेच्या उदघाटन प्रसंगी वर्तमानपत्रांमध्ये पान भरून जाहिरात दिली. मात्र त्यात राज्यातील मंत्र्यांची नावे नव्हती. हा प्रकार लक्षात आल्याने नितीन राऊत यांनी स्पष्टपणे या संदर्भांत आपली नाराजी बोलून दाखवली. 'नागपुरचा असलेला सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नागपुरचा विकास व्हावा यासाठी संयुक्तिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भविष्यात महामेट्रोने अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी', असे राऊत यांनी म्हटले.