नागपूर - 'रस्ते वाहतुकीपेक्षा जलवाहतूक फायदेशीर ठरत आहे. यासाठी उत्पादनापासून विक्रीपर्यंत लागणारा खर्च अत्यंत कमी होत आहे,' अशी माहिती केंद्रीय जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
'जेवढे इन्स्पेक्टर तेवढी पाकिटं'; नितीन गडकरींचे 'लायसन्स राज' वर वक्तव्य नागपूरमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरकार 'लायसन्स राज' विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर बोलताना, 'जेवढे इन्स्पेक्टर, तेव्हढी पाकिटं द्यावी लागतात', असा त्यांनी टोला लगावला.
गंगा नदीतून सुरू करण्यात आलेल्या जलमार्गाने 280 लाख टन वाहतूक केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्त्याने वाहतूक करण्यासाठी एका किमीला 10 रु आणि रेल्वेला 6 रुपये खर्च होतो. परंतु, सरकारने अवलंबलेल्या जलवाहतुकीसाठी 1 रु खर्च होत असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच यापुढे जलवाहतुकीसाठी इथेनॉलचा वापर इंधन म्हणून वापर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे हा खर्च थेट पन्नास टक्क्याने कमी होणार असून यापुढे 50 पैसेच लागणार आहेत, असे ते म्हणाले.
सध्याच्या आर्थिक परिस्थितीला जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी व मागणी-पुरवठ्यातील तफावत कारणीभूत असल्याचे गडकरी यांनी म्हटले. तसेच औद्योगिक वाढीसाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.