महाराष्ट्र

maharashtra

धक्कादायक! क्राईम कॅपिटल नागपुरात तीन दिवसांत नऊ खून

By

Published : Jun 22, 2021, 8:57 PM IST

राज्याचे क्राईम कॅपिटल असलेल्या नागपुरात केवळ तीन दिवसांच्या अंतरात नऊ लोकांचा खून झाला आहे, अर्थात यामध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा खून झाल्याच्या घटनेचा समावेश आहे. अचानक खुनाच्या घटना वाढल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व प्रकारात समाधानाची बाब म्हणजे बहुतांश प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नागपुरात तीन दिवसांत नऊ खून
नागपुरात तीन दिवसांत नऊ खून

नागपूर -राज्याचे क्राईम कॅपिटल असलेल्या नागपुरात केवळ तीन दिवसांच्या अंतरात नऊ लोकांचा खून झाला आहे, अर्थात यामध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा खून झाल्याच्या घटनेचा समावेश आहे. अचानक खुनाच्या घटना वाढल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व प्रकारात समाधानाची बाब म्हणजे बहुतांश प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नऊ पैकी सहा खून हे अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता आहे. नऊ पैकी दोन खून हे कुही आणि उमरेड तालुक्यात झाले आहेत.

पहिली घटना

नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम ठवकर नामक तरुणाचा दोन आरोपींनी मिळून खून केला आहे. त्यामध्ये शोएब उर्फ जॉनी शाहिद शेख आणि विक्रांत ऊर्फ विकी महेंद्रसिंग चंदेल या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. मृतक शुभम आणि शोएब हे दोघेही ट्रक चालक असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण आणि मारामारी झाली होती. त्याचाच वचपा काढण्यासाठी आरोपींनी शुभमची हत्या केली.

दुसरी घटना

दुसरी घटना २० जून रोजी कुही तालुक्यातील मांगली शिवार येथे उघडकीस आली होती. वकील ज्ञानेश्वर फुले हे त्यांच्या पत्नीसह शेतावर गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतावर काम करणारा नरेंश कुरुडकरचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी या संदर्भात तपास केला तेव्हा, काही दिवसांपूर्वी शेतावर काम करणारे अविनाश नरुळे आणि राकेश महाजन यांनी संगनमत करून नरेशचा खून केल्याचे समोर आले. आरोपींना माहिती मिळाली होती की वकील ज्ञानेश्वर फुले हे मोठी रक्कम शेतावर ठेवतात,ती लुटण्याच्या उद्देशाने आरोपींनी नरेशचा खून करून लाखो रुपये लुटले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून ३७ लाख रुपये जप्त केले आहेत.

तिसरी घटना

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुसरी घटना सोमवारी घडली होती. संपत्तीच्या वादातून पुतण्या आणि त्याच्या पत्नीने संगणमत करून काकाची हत्या केल्याचं उघड झाले आहे. नामदेव लक्ष्मण निनावे असं मृतक इसमाचे नाव आहे, तर नितीन आणि त्याची पत्नी माधुरी असे आरोपीचे नाव आहेत. काका नामदेव आणि पुतण्या नितीन एकाच घरात राहायचे. संपत्तीच्या विषयावरून त्यांच्यात रोज वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात असाच वाद झाला, तेव्हा मृतक नामदेव याने नितीनच्या मुलाची गळा आवळून खून करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे संतापलेल्या नितीनने काकांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. पाचपावली पोलिसांनी नामदेव निनावे यांच्या खून प्रकरणात नितीन आणि त्याची पत्नी माधुरीला अटक केली आहे

चौथी घटना

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात पाच लोकांना संपवून आरोपीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आरोपी आलोक माटूरकार याने सर्वात आधी त्याच्या मेव्हणीचा गळा चिरून हत्या केली, हत्येपूर्वी त्याने मेव्हणीवर बलात्कार देखील केला. पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हाईस रेकॉर्डवरून ही बलात्काराची घटना समोर आली. दरम्यान मेव्हणीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपली सासू, बायको, मुलगा आणि मुलीची हत्या केली, व स्व:ता देखील आत्महत्या केली.

एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या

पाचवी घटना

नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर परिसरात एका तरुणाची दोन ते तीन आरोपींनी मिळून हत्या केल्याची घटना घडली आहे. योगेश धोंगडे (३०) असे मृतकांचे नाव आहे. अनैतिक संबधातून योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस उपायुक्त लोहित मातानी यांनी दिली आहे. घटनेतील आरोपी गोलू धोटे हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत पळून गेला असल्याने कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंद करून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा -प्लॅटफॉर्म तिकीट 50वरून 10 रुपये करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details