नागपूर -गेल्या दोन दिवसांपासून ज्या गोष्टीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्या चर्चेला अखेर विराम मिळालेला असून भाजपामधून आयात केलेले काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार (MVA Candidate For Legislative Council Election) रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मतदानाला काही तास शिल्लक असताना ऐन वेळेवर कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार असलेल्या मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress President Nana Patole) यांनी हा निर्णय घेतला आहे. ऐनवेळी घडलेल्या घटनेमुळे काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला 'पंजा' ऐवजी अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाससमोर मतदान करण्याची वेळ आली आहे.
नाना पटोलेंच्या निर्देशानुसार निर्णय -
काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष यांनी अधिकृतरीत्या पत्र काढून अशा पद्धतीची घोषणा केल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला शेवटचे काही तास शिल्लक असताना अचानक झालेला हा फेरबदल राजकीय वर्तुळात मोठा भूकंप म्हटला तरी वावगे ठरणार नाही, अशीच काहीशी घटना घडली आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसात हे पत्र काढण्यात आले असून हे पत्र काँग्रेसचे शहर काँग्रेस कमिटीचे आणि ग्रामीणचे अध्यक्ष यांना पाठवण्यात आले आहे.