नागपूर- नागपूरच्या आयटी पार्क परिसरापासून जवळच असलेल्या गायत्री नगरमध्ये एकाला सकाळी पावने दहा वाजताच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे आढळून आले. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बिबट्या सुरुवातीला नरेंद्र चाकोले नावाच्या व्यक्तीला दिसून आला.
'बाथरूममध्ये दिसला बिबट्या'
नागपुरातील नरेंद्र चाकोले हे गायत्री नगर (आयटी पार्क) परिसरात राहतात. ते सकाळी कुलरमध्ये पाणी भरण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास बाथरूममध्ये बिबट्या दिसला. ते घाबरले असताना ओरडले आणि तेवढ्यात बिबट्याने पळ काढला. यावेळी मात्र त्यांच्या पायाला नख लागले असल्याचे ते सांगतात. त्यानंतर पोलीस आणि वन विभागाला माहिती देण्यात आली. या परिसरात वन विभागाकडून सर्चिंग मोहीम राबवली जात आहे. शहरातील माध्यभागी असलेल्या परिसरात हा बिबट दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.