नागपूर - भाजप विरोधात देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण ती मोट बांधताना काँग्रेस पक्षाशिवाय एकजुटीने मोट बांधली जाऊ शकत नाही, अशीच भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची असल्याचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik on Opposition Alliance ) यांनी स्पष्ट केले. ते गोंदियाच्या दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, की देशात 2024 च्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका ( NCP spokesperson on 2024 Loksabha election ) डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम या देशात सुरू आहे. त्यांचे नेतृत्व कोण करेल, हा आताचा तो विषय नाही. सामुहिक नेतृत्व राहिले पाहिजे, अशीच भूमिका असणार आहे. एकदा सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यानंतर पुढील रणनीतीबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा-MP Dr. Amol Kolhe Trolled : 'पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर पण...'; डॉ. अमोल कोल्हेंचे ट्वीट
काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधकांची मूठ बांधणार-
पुढे मलिक म्हणाले, की काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाही. हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशीच भूमिका ममता बॅनर्जी यांनीही मांडली आहे. सगळे एकत्र येऊन एकजुटीने काम कारून विरोधकांचा मोर्चा बांधू. 2024 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देऊ. देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे 2024 मध्ये नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षासोबत युपीएचे घटक नसलेल्या खासदारांची संख्या ही 150 च्या घरात आहे. त्या सगळ्यांची एकजूट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.