नागपूर -राज्यात अस्तित्वात आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय एक-एक करून बदलले जात आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पुर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय बदलून आपण काहीतरी करून दाखवल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. सरकारने नवीन काही करून दाखवल असते तर मी त्यांचे अभिनंदन केले असते. फक्त निर्णय रद्द करून काय साध्य होत आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी उपस्थित केला आहे. ते नागपुरात बोलत होते.
'तीनही पक्ष मिळून निवडणूक लढवू' :आगामी पुढच्या काळात होऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन लढवावी, अशी इच्छा मी आधीच व्यक्त केली आहे. तशीच इच्छा आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बोलून दाखवली आहे, तसे झाल्यास चित्र नक्की बदलेल, या करिता तीनही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले आहेत. नवीन सरकार स्थापन होऊन आता बरेच दिवस झाले आहे, तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एकीकडे राज्यात पूर्ण परिस्थिती आहे तर दुसरीकडे विभागांना मंत्रीच नसल्यामुळे जनतेचे हाल होत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.