नागपूर :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा (Indian Independence Day) निमित्त विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, कर्तृत्ववान महिलांचा शोध घेऊन त्यांची यशोगाथा देशातील जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारत कडून केला जातो आहे. आज आपण नागपूरची (Nari Shakti) पहिली महिला मेट्रो चालक (Nagpur Metro train) म्हणून ओळख (First woman driver) मिळवलेल्या, 29 वर्षीय निकिता दुर्गेश महाजन (Nikita Mahajan) यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा जाणून घेत आहोत. निकिता महाजन ही नागपूर मेट्रो ट्रेनची पहिली महिला चालक म्हणून, आता सर्व नागपूरकरांच्या परीचयाची झाली आहे. शेकडो प्रवाश्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळणाऱ्या निकिताने कधीही मेट्रो चालक होण्याचे स्वप्न बघितले नव्हते. मात्र, ज्यावेळी तीने या क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासुन प्रवासी सुरक्षा सर्वतोपरी या सूत्राचे पालन करत; ती यशस्वीपणे गेल्या साडेतीन वर्षांपासून मेट्रो ट्रेनचे संचलन करीत आहे.
निकिता महाजन या मूळच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील रहिवासी आहेत. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या निकिता यांनी किट्स कॉलेज रामटेक येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंचे शिक्षण पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पुढेचे शिक्षण घ्यावे की नोकरी करावी या दुविधेत असतांना, त्यांच्या हाती मेट्रोची एक जाहिरात पडली. खऱ्या अर्थाने त्या जाहिरातीमुळे निकिताच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
मेट्रोची परीक्षा केली उत्तीर्ण :निकिता नोकरीच्या शोधात होत्या. त्यादरम्यान वर्तमानपत्र चाळत असतांना महा- मेट्रोने विविध पदाच्या भर्तीसाठी दिलेली जाहिरात त्यांच्या दृष्टीत पडली. त्यांनी मेट्रोची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने निकिताने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासला सुरुवात देखील केली. नोकरीसाठी जीवनातील पहिली परीक्षा देतांना मनावर कोणतेही दडपण न येऊ देता;त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. बघता बघता परीक्षा झाली आणि निकिता त्यात उत्तीर्ण देखील झाल्या. त्यानंतर त्यांची निवड ही मेट्रो ट्रेन ऑपरेटर म्हणून झाली. तेव्हापासून निकिताने मागे वळून बघितले नाही.
प्रवासी सुरक्षा सर्वतोपरी :मेट्रो ट्रेनच्या चालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रवासी सुरक्षा सर्वतोपरी, या सूत्रानुसारचं काम करावे लागते. प्रत्येक वेळी शेकडो प्रवाश्यांना सुखरूप एका स्टेशनवरून त्यांच्या गंतव्य स्थानावर पोहचणे, हे अत्यंत जबाबदारीचे काम असल्याची जाणीव निकिताला आहे.