नागपूर : नागपुरात कोरोनाचे थैमान सुरू असताना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा कमी पडू लागल्यात. या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी समाजातील दानशुरांना मदतीचे आवाहन केले. याला दुबईतील नागपुरकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत 400 ऑक्सिजन सिलिंडरसह 650 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
नितीन गडकरींच्या आवाहनाला प्रतिसाद
कोरोनाच्या संकटात रुग्णालयांत बेड तसेच रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याच्या घटना देशभरात समोर येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागपूरसह विदर्भाला त्राही त्राही करून सोडले आहे. रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोर्चा सांभाळात समाजातील दानशूरांना मदतीचे आवाहन केले होते. गडकरींच्या आवाहनाला थेट दुबईतील नागपुरकरांनी प्रतिसाद दिला आहे. दुबईत राहणारे मुळचे नागपूरकर असलेले डॉ. संजय पैठणकर यांनी दुबईतील भारतीय मित्रांच्या मदतीने नागपूर शहराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.