नागपूर -विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर शहरच्या इतवारी परिसरात असलेल्या विदर्भ चंडिका मंदिरासमोर आज पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढ होणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र ते सत्तेत आल्यापासून सातत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत आहे. ही जनतेची फसवणूक आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाला विदर्भवादी नेते राम नेवले यांची उपस्थिती होती.
विदर्भातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यासह शंभर ठिकाणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले आहे, असा दावा राम नेवले यांनी केला आहे. देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार येण्यापूर्वी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सातत्याने इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करायचे. मात्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपाचे सरकार आले. भाजपा सरकारच्या काळात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, पेट्रोल शंभरीपार पोहोचले असून, याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.