नागपूर : शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे शासकीय आणि खासगी हॉस्पिटलवर प्रचंड ताण वाढलेला आहे. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्सिजनचा साठा उपलब्ध व्हावा याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूरला ऑक्सिजनचे पाच टँकर्स उपलब्ध होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेतली आणि संपूर्ण समन्वय घडवून आणला. त्यानुसार आज ऑक्सिजनचा पहिला टँकर येण्याची शक्यता आह. दोन दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सिलतरा, रायपूर येथील जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लांटचे सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल यांच्याशी संपर्कात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन पाच टँकर्स देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मग प्रश्न होता, तो ऑक्सिजन नागपूरला आणण्याचा. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी टँकर्स देण्याचे मान्य केले. त्यानंतर फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून दोघांचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले आणि त्वरेने पुढची कारवाई करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्वरेने कारवाई करू, असे सांगितले. त्यामुळे आगामी 10 दिवसात 5 ऑक्सिजन टँकर (एक दिवसाआड एक टँकर) नागपूरला उपलब्ध होणार आहेत.