नागपूर - शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढतीवर आहे. दररोज सरासरी 200 रुग्णाची भर पडत असताना आज शहरात 6 स्वाईनफ्लूचे रुग्ण मिळून आल्याने धडकी भरली आहे. यासोबतच कोरोनाचे 291 रुग्ण मिळाले असताना दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Nagpur Corona Update ) त्यामुळे नागपुरकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. स्वाईन फ्ल्यूचचे यापूर्वी 14 रुग्ण मिळून आले असताना ही संख्या आज वाढून 22 वर जाऊन पोहचली आहे.
18 रुग्ण पॉझिटिव्ह -कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लूचे या वर्षात एकूण 22 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 16 रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्धीतील असून 6 रुग्ण शहराबाहेरील आहेत. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णात ( Nagpur swine flu Update ) मागील काही दिवसापासून सातत्याने वाढ होत आहे. महानगरपालिका साथरोग विभागाकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील वेगवेगळया भागात निवासी असलेले एकूण 18 रुग्णाचे प्रयोगशाळा तपासणीत अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आजार सौम्य पण दुर्धर आजारी व्यक्तीने काळजी घेण्याची गरज -स्वाईन फ्लू हा तसा सौम्य आजार असला, तरी जोखमीचे गटातील जसे जेष्ठ नागरीक, गर्भवती स्त्रिया, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा प्रतिकारशक्ती कमी असणा-या व्यक्तीमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. त्यामुळे जीवाला धोका सुध्दा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सहज न घेता सतर्क राहावे, असे आवाहन साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.