नागपूर - जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. पुढील काळात आणखी लसी केंद्र सरकारकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान रात्री उशिरा पुन्हा चार टँकर वायुदलाच्या विशेष विमानाने ओडिशा राज्यातील अंगूळ येथील स्टील प्लांटला रवाना करण्यात आले असून आज सायंकाळपर्यंत चार ऑक्सिजन टँकर नागपूर शहरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा गती मिळाली आहे. जिल्ह्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ४५ हजार कोव्हीशिल्ड, तर १६ हजार कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. नव्याने प्राप्त झालेल्या १६ हजार कोव्हॅक्सिनमधून ग्रामीण भागातील सावनेर, कामठी येथील केंद्रावर तर नागपूर शहरातील महाल, छापरू स्कूल, मानेवाडा यूपीएससी या केंद्रावर १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण केले जात आहे. अन्य ४५ हजार लसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
ओडीसा येथून ऑक्सिजनचा पुरवठा:-
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता ओडिशा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी चार टँकर एअरफोर्सच्या विमानाने रवाना झाले होते. गुरुवारी रात्री पुन्हा चार टँकर रवाना करण्यात आले आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगूळ येथील स्टील प्लांट मधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. ६ मे रोजी जिल्ह्यात १०६ मेट्रीक टन ऑक्सिजन प्राप्त झाला.
जिल्ह्यात भिलाई, रायपूर, नागपूर, येथील ऑक्सिजन फिलींग सेंटरवरून ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील जगदंबा, भरतीया, आदित्य, आसी, रुक्मिणी या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून १३८ मेट्रीक टनाची क्षमता आहे. त्यापैकी आज ७६ मेट्रीक टनची गरज असून ५२ मेट्रीक टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. तर मेयो, मेडीकल, शालिनीताई मेघे, लता मंगेशकर हॉस्पिटल, ॲलेक्सीस हॉस्पिटल, अवंती, क्रिम्स, ऑरेंजसिटी, शुअर टेक, वोक्हार्ट, आशा हॉस्पीटल कामठी, ७१मेट्रीक टनची गरज असतांना ८० मेट्रीक टन ऑक्सिजन वितरीत करण्यात आला आहे. तर चंद्रपूर, वर्धा, भंडारा, सावंगी, छिंदवाडा, अकोला, आदी ठिकाणी देखील आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे
रेमडेसिवीर इंजेक्शन
जिल्ह्यात आज एकूण ४ हजार ४८५ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील १५६ तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले आहे. अन्न, औषध व प्रशासन, यांचे अधिकारी-कर्मचारी यांनी वितरण तक्त्यानुसार वाटप होत असल्याची खातरजमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.