नागपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या 'जनता कर्फ्यू'दरम्यान नागपूर पोलिसांचा संवेदनशील चेहरा समोर आला आहे. जनता कर्फ्युमुळे घरी जायला वाहन मिळत नसलेल्या एका आजारी दाम्पत्याची हतबलता ओळखून सीताबर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जागवेंद्र सिंह राजपूत यांनी तातडीने त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. हा संपूर्ण घटनाक्रम ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आज जनता कर्फ्यूमुळे सर्व रस्ते ओस पडले होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच कामानिमित्त बाहेर पडलेले दिसून येत होते. शहरातील चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. त्याच वेळी एक थकलेले दाम्पत्य सुमारे तासाभरापासून सीताबर्डी परिसरातील व्हेराईटी चौकात रिक्षाची वाट पाहत असल्याचे पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच त्यांना बसण्यासाठी खुर्ची देत, त्यांची विचारपूस केली.