नागपूर -एखाद्या प्रतिष्ठित कंपनीतील संचालकांची माहिती गोळा करायची, त्या संचालकांच्या नावावे बनावट ईमेल आयडी तयार करून तो देशातील इतर शहरांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवून मोठी रक्कम स्वतःच्या किंवा दुसऱ्या आरोपींच्या नावावे ट्रान्सफर करण्याचे आदेश देऊन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाच एका अशयाची तक्रार नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सदर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने दोन आरोपींना अटक करून त्यांनी सुरू केलेल्या ठगबाजीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला.
हेही वाचा -Nagpur Ramdas Athavle PC : 'उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे'
पोलिसांनी दोन्ही आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांनी आणखी कोणत्या-कोणत्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या ठगबाजांनी दिल्ली येथील ग्रोव्हर इन्फोटेक नामक कंपनीतील मालकाच्या नावाने नागपूर येथे कार्यरत कर्मचारी संध्या रघुवंशी यांना एक ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये त्यांनी एका बँक खात्याची माहिती नमूद केले होती. त्या बँक खात्यात तात्काळ चार लाख 80 हजार रुपये ट्रान्स्फर करण्याची सूचना देण्यात आली होती. ईमेल थेट कंपनीच्या मालकाकडून आला असल्याने कर्मचाऱ्याने देखील कोणतीही शहानिशा न करता लगेच चार लाख 80 हजार ट्रान्स्फर केले. मात्र, ज्यावेळी दिल्लीतील अकाउंटने चार लाख 80 हजार हिशेब विचारला तेव्हा हा संपूर्ण प्रकार पुढे आला. बनावट ईमेलच्या आधारे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.