नागपूर -नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एका गांजा तस्कराला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १६० किलो गांजा जप्त केला आहे. अजय खेमानंद भट्ट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा दिल्ली येथील रहिवासी असून तो तिथे कॅब (टॅक्सी) चालक म्हणू काम करायचा. मात्र लॉकडाऊन आणि शेतकरी आंदोलनामुळे त्याचा रोजगार हरवला असल्याने तो गांजा तस्करीच्या कामात सक्रिय झाला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख सार्थक नेहते यांनी दिली आहे.
गाडीची झडती
अंमली पदार्थविरोधी पथकाला गुप्त सूचना मिळाली होती, की एक व्यक्ती गांजाची मोठी खेप घेऊन नागपूर मार्गे दिल्लीला निघालेला आहे. या सूचनेच्या आधारे पोलिसांनी महालगाव कापसी भागात सापळा रचला होता. पोलिसांनी माहिती मिळालेली संबंधित कार दिसताच पोलिसांनी गाडी त्या गाडीच्या चालकाला थांबण्याचे निर्देश दिले. आरोपीने गाडी थांबवताच पोलिसांनी अजय खेमानंद भट्ट याला ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागील भागात ६ पोत्यांमध्ये एकूण २४ लाख ५ हजार ९१० रूपये किंमतीचा १६० किलो ३९४ ग्रॅम गांजा सापडला.