महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर मनपाच्याही कोट्यवधींच्या ठेवी येस बँकेत - येस बँकेत ठेवी अडकल्या

नागपूर विद्यापीठानंतर आता नागपूर महानगरपालिकेची देखील ठेव येस बँकेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे एकूण 95 कोटी रुपये येस बँकेत अडकले आहे.

nagpur municipal deposit in yes bank
नागपूर मनपाच्याही कोट्यवधींच्या ठेवी येस बँकेत अडकल्या

By

Published : Mar 12, 2020, 2:20 PM IST

नागपूर - आर्थिक अडचणीत असलेल्या नागपूर महानगरपालिकेचे येस बँकेत ९५ कोटी रुपये अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. येस बँकेवर आर्थिक अनियमिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी खातेधारकांसमोर संकट उभे ठाकले असतानाच नागपूर मनपाचीही मोठी रक्कम बँकेत अडकल्याची बाब पुढे आली आहे.

नागपूर मनपाच्याही कोट्यवधींच्या ठेवी येस बँकेत ; 95 कोटींची रक्कम अडकली

हेही वाचा...जगभर पसरलेला कोरोना 'साथीचा रोग', जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा

महानगरपालिकेच्या वित्त विभागाकडून येस बँकेत परस्पर खाते उघडण्यात आले असल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे. येस बँकेतील रकमेत मालमत्ता कर, बाजारसह इतरही करांतून गोळा झालेला दैनंदिन निधी जमा केला जात होता. मनपाचे बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाते आहे. तसेच नियमानुसार राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक असताना एका खासगी बँकेत मनपाला का खाते उघडावे लागले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोणत्या लेखाधिकाऱ्याच्या काळात हे खाते उघडण्यात आले, याबद्दल माहिती घेतली जात आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल ९५ कोटींची ही रक्कम असल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम आता परत कशी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक महिन्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नसल्याने मनपाला हा निधी काढण्यासाठी बराच कालावधी लागेल. स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी मनपाचे ९५ कोटी येस बँकेत अडकल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेत शहरात अनेक विकासांची कामे करता येणे शक्य आहे. आर्थिक अडचणीमुळे विकास कामे ठप्प असताना, प्रशासनाने या रक्कमेची माहिती जाहीर केली नाही, याबद्दलही सभापतींनी नाराजी व्यक्त केली. शिवाय, राष्ट्रीयकृत बँकेत खाते असतानाही खासगी बँकेत निधी कसा जमा करण्यात आला, याची चौकशी करण्यात येईल, असे मत व्यक्त केले. ही रक्कम मोठी असल्याने याबाबत आयुक्त व प्रशासनाकडून अधिकृत माहिती घेऊन पुढील कार्यवाही होईल, असे झलके यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details