नागपूर - मागील दहा महिन्यांपासून कोविड-१९ अर्थात कोरोना नावाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र आता कोरोनाचा वर लस येणार असल्याने प्रत्येकाला या लशीची आतुरता आहे. त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्षात लस उपलब्ध होईल, त्यावेळी त्याचे नियोजन कसे केले जाणार, या संदर्भात शासनातर्फे कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरी टास्क फोर्स समितीची बैठक बोलवण्यात आली होती. यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तयारीचा आढावा घेतला. लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. त्यासाठी शहरातील संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
कोरोना लसीकरणासाठी सज्ज राहा.. तीन टप्प्यात 'कार्यक्रम' : आयुक्त राधाकृष्णन बी. - corona vaccination in nagpur
मागील दहा महिन्यांपासून कोविड-१९ अर्थात कोरोना नावाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र आता कोरोनाचा वर लस येणार असल्याने प्रत्येकाला या लशीची आतुरता आहे. त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्षात लस उपलब्ध होईल, त्यावेळी त्याचे नियोजन कसे केले जाणार, या संदर्भात शासनातर्फे कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
कोरोना काळात आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यानंतरचा टप्पा म्हणजे लसीकरणाचा आहे. ही जबाबदारीही त्यांनाच पार पाडायची आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन वॉरिअर्स यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्हीचा डाटा बेस तातडीने तयार करावा, अशा सुचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. तसेच झोन निहाय खासगी रुग्णालयांकडूनही तातडीने माहिती मागवावी,असे निर्देश त्यांनी दिले आहेत. लसीकरणासाठी शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती, त्याची चाचपणी, आवश्यक असलेल्या सोयी, आवश्यक असलेली कोल्ड चेन याबाबतचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
लसीकरण सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण वर्ग
सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान यांनी कोविड लसीकरणासंदर्भात तयारी कशी असावी, याचे सादरीकरण केले. लसीकरण केंद्र कसे असावे, तेथे काय काय सोयी असाव्यात, तेथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यायची, लसीकरण मोहिमेत कुठल्या विभागाची काय भूमिका राहील, आदींबाबत त्यांनी माहिती दिली. व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत मार्गदर्शन केले. लसीकरण मोहीम राबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल. पहिले प्रशिक्षण १९ डिसेंबर रोजी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनीही मनपाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. लाभार्थ्यांची माहिती जमा करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या 'कोव्हीन' अॅप बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
१७ जानेवारीला पल्स पोलीओ मोहीम
भारत देश पोलिओमुक्त झाला आहे. यापुढेही देशात पोलिओचा शिरकाव होऊ नये यासाठी दरवर्षी पोलिओ अभियान राबविण्यात येते. यंदा १७ जानेवारी २०२१ रोजी पोलिओ अभियान राबविण्यात येणार असून ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान यांनी दिली. यासाठी टास्क फोर्सची भूमिका महत्त्वाची असते. पोलिओ अभियानादरम्यान शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १०० टक्के बालकांना पोलिओ डोस देण्यात येईल, यादृष्टीने तयारी आणि जनजागृती करावी, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.