नागपूर -सिंगल युज प्लास्टिक पिशवी पर्यावरणासाठी घातक आहे. तरी सुद्धा नागपूर शहरात विविध दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होताना दिसत आहे. अनेक प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरसुद्धा प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होताना दिसत नसल्याने नागपूर महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने एक मोहीम उघडली आहे. त्या अंतर्गत गेल्या 15 दिवसांमध्ये हजारो किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा -Hedgewar Smriti Bhavan : गेल्यावर्षी दोन दिवस नागपुरात मुक्कामी होता दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख
देशातील कोणत्याही शहराला स्वच्छ, सुंदर बनवायचे असले तर पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या विषयावर बोलणारे अनेक भेटतील, मात्र कृती सर्वांची शून्य आहे. म्हणून नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक/आयुक्त राधाकृष्ण बी यांच्या आदेशानुसार सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विशेषतः रस्त्यावरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल मार्केटमधील फुलांच्या दुकानांची तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येत आहेत.