नागपूर - महामेट्रोच्या रिच-१ या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. नागरिकांच्या सोयी - सुविधांसाठी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने काम प्रगतीपथावर असताना सामान्य नागरिकांकडून मेट्रोची गती वाढविण्याची मागणी केली जात होती. नागरिकांच्या मागणीला अनुसरुन आरडीएसओद्वारे सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्थानकादरम्यान ऑसीलेशन ट्रायल घेण्यात आली आहे. महामेट्रोद्वारे चार हजार पोती मेट्रो रेल्वेत भरून ९० किमी प्रती तासाने मेट्रो चालवण्यात आल्याची माहिती आहे.
९७० प्रवाशांच्या वजना इतकी म्हणजे ६३ टन रेतीची पोती रेल्वेमध्ये भरण्यात आले होते. यानंतर गाडीत काही यंत्राच्या साहाय्याने गतीमार्यादा आणि प्रवासा दरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली. 'आरडीएसओ'च्या मापदंडानुसार ही चाचणी घेण्यात आली आहे. सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून ५० किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली. हळूहळू वेग वाढवण्यात आला, त्यानंतर ताशी ९० किमीपर्यंत चालविण्याची परीक्षाही मेट्रोने उत्तीर्ण केली आहे. या परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती.