नागपूर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर स्कुल व्हॅनला रुग्णवाहिकेत परिवर्तीत करा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदिप जोशी यांनी केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन म्हणून मनपाच्या प्रादेशिक परिवहन विभागाला पत्राव्दारे हे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय यातून स्कुल व्हॅन चालकांनाही रोजगार मिळेल, असेही महापौरांनी सांगितले.
सर्वत्र सध्या कोरोना फोफावत आहे. अनेक शहरांमध्ये आरोग्य विषयक सोयी सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रुग्णवाहिके अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याकडून स्कुल व्हॅनला रुग्णवाहिकेत रूपांतरीत करा, अशा आशयाचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आले आहे. शहरातील भविष्याची परिस्थिती पाहता गैरसोय होवू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात यावी असे आवाहनही जोशी यांनी केले आहे. शिवाय अनेक दिवसांपासून शाळा बंदच आहेत त्यामुळे स्कुल व्हॅन देखील बंद अवस्थेत आहेत. यात किरकोळ बदल करुन रुग्णवाहिकेत रुपांतर केले तर महानगरपालिकेला मोठी मदत होईल, असेही संदिप जोशी यांनी सांगितले.