नागपूर -एका इंजेक्शनची किंमत १६ कोटी रुपये देखील असू शकते यावर कुणालाही विश्वास बसणार नाही पण हे अगदी खरे आहे. हल्ली असे आजार पुढे येत आहेत, ज्यांच्यावरील उपचार कुणालाही परवडणारे नाहीत. नागपूरमध्ये राहणाऱ्या सोरते दाम्पत्याची २१ महिन्यांच्या चिमुकलीला अति-दुर्धर आजाराने ग्रासले आहे, त्यावर उपचार करण्यासाठी हे १६ कोटींचे रुपये किंमत असलेल्या इंजेक्शनची तिला नितांत गरज आहे, इम्पोर्ट ड्युटी धरून हे इंजेक्शन तब्बल २० कोटी रुपयांचे होणार आहे.
नागपूरच्या श्राव्यावर उपचारासाठी हवंय 16 कोटींचं इंजेक्शन, आई-वडिलांनी केले मदतीचे आवाहन श्राव्याच्या आई-वडिलांनी समाजाकडून व्यक्त केली मदतीची अपेक्षा
श्राव्या सोरते असे या चिमुकलीचे नाव आहे. तिला स्पायनल मस्कुलार अट्रॉफी ( Spinal muscular atrophy ) या अतिदुर्धर आजाराने ग्रासले आहे. १६ कोटी रुपये जमा करणे जवळपास अश्यक्य असल्याने श्राव्याच्या आई वडिलांनी समाजाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
'केंद्र सरकारने इम्पोर्ट ड्युटी माफ करून मदत करण्याचे आवाहन'
श्राव्याचे वडील होमिओपॅथी डॉक्टर आहेत तर आई गृहिणी. सोरते कुटुंब अगदीच सामान्य कुटुंबासारखंच आहे. श्राव्याच्या रूपाने त्यांच्या कुटुंबातील हे पाहिले अपत्य आहे. २१ महिन्यांपूर्वी जेव्हा श्राव्याचा जन्म झाला होता तेव्हा तर आकाश ठेंगणे वाटावे इतका आनंद सोरते कुटुंबियांना झाला होता, मात्र ज्यावेळी श्राव्याला या आजाराने ग्रासले तेव्हापासून श्राव्याचे आई-वडील तिच्या उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करताना चिंतातुर झाले आहेत. त्यांनी क्राऊड-फंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे, मात्र रक्कम फार मोठी असल्याने केंद्र सरकारने इम्पोर्ट ड्युटी माफ करून मदत करण्याचे आवाहन केले आहे.
श्राव्या ८ महिन्यांची असताना झाला आजार
श्राव्या जन्मानंतर अगदी सामान्य बाळांप्रमाणचे हसायची, खेळायची. आठ महिन्यांची झाली तोपर्यंत तिला कुठलाही आजार नव्हता. मात्र काही दिवसांनी तिच्या हालचाली कमी व्हायला लागल्या. तसेच श्राव्याच्या कंबरेपासूनचा खालचा भाग संवेदनाहीन (लुळा) व्हायला लागला. श्राव्याचा आजार पाहून तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नागपुरातील डॉक्टरने या मुलीला बंगळुरुला जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बंगळुरुतील डॉक्टर्सनी या चिमुकलीला स्पायनल मस्कुलार अट्रॉपी हा दुर्धर आजार जडल्याचे सांगितले.
Zolgensma हे जगातील सर्वात महाग इंजेक्शन
बॅंगलोर येथील डॉक्टरांनी श्राव्याला स्पायनल मस्कुलार अट्रॉफी ( Spinal muscular atrophy ) या अतिदुर्धर आजाराने ग्रासले असल्याचे निदान केल्यानंतर यावर उपचार करण्यासाठी Zolgensma हे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितले. हे इंजेक्शन जगातील सर्वात महाग इंजेक्शन असून त्याची किंमत १६ कोटी रुपये इतकी आहे. ते भारतात आणण्यासाठी ४ कोटी रुपये इम्पोर्ट ड्युटी देखील भरावी लागेल, त्यामुळेच या इंजेक्शनची एकूण किंमत २० कोटी रुपये असल्याचे डॉक्टरांनी श्राव्याच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
हेही वाचा -धावत्या कारमध्ये धांगडधिंगा करणाऱ्या ४ तरुणांना अटक