महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केली आरोपीची निर्दोष सुटका, वाचा काय आहे प्रकरण - Nagpur Live News Update

सव्वा किलो चरस तस्करी करताना रंगेहात पकडल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहा तास विलंबाने गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून विलंबाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. त्याचबरोबर कारवाई दरम्यान सरकारी पंचही बोलवले नाही. ही परिस्थिती अनाकलनीय असल्याने पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत व्यक्त करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. घुगे यांनी सबळ पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष सुटका केली आहे.

nagpur district court
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय

By

Published : May 20, 2022, 7:45 PM IST

नागपूर -सव्वा किलो चरस तस्करी करताना रंगेहात पकडल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहा तास विलंबाने गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून विलंबाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. त्याचबरोबर कारवाई दरम्यान सरकारी पंचही बोलवले नाही. ही परिस्थिती अनाकलनीय असल्याने पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत व्यक्त करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. घुगे यांनी सबळ पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष सुटका ( Innocent release of charas smuggler in Nagpur ) केली आहे. निलेश रमेश आसरे (४२) असे निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

'पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह' - ११ जुलै २०१७ रोजी नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून हुडकेश्वर मार्गावर आरोपीला त्याच्या कारमधून चरस तस्करी करताना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एका पिशवीतून पोलिसांना १ लाख २४ हजार रूपये किंमतीची १ किलो २४२ ग्रॅम चरस सापडली. या प्रकरणी पोलिसांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तेव्हा पासून आरोपी कारागृहात होता. या प्रकरणी सत्र न्यायाधीश घुगे यांच्यासमक्ष खटला चालवण्यात आला. सर्व साक्षीदार आणि पुरावे तपासून दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सहा तास विलंबाचा हिशोब देता आला नाही - पोलिसांना ११ जुलै २०१७ ला दुपारी ३.१० वाजता गोपनीय माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले. यानंतर ताबडतोब गुन्हा दाखल अपेक्षित असताना घटनास्थळ हुडकेश्वर पोलीस ठाण्यापासून जवळच असताना तब्बल सहा तास विलंबाने म्हणजे मध्यरात्री १२ वाजता गुन्हा दाखल केला. घटनास्थळापासून पोलीस ठाण्यात पोहोचून गुन्हा दाखल करण्यासाठी एनडीपीएस पथकाला इतका विलंबा का लागला, हे पोलिसांना स्पष्ट करता आले नाही.

कायद्यातील मार्गदर्शक तत्वांचे पालन नाही -आरोपीची अंगझडती घेताना पोलिनांनी कायद्यातील मार्गदर्शक तत्वांचे पालन केलेले दिसत नाही. तसेच पोलिसांचे जबाब व स्वतंत्र साक्षीदारांच्या जबाबात प्रचंड विषमता आहे. यावरून पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची शक्यता नाकारता येत नसून सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

जप्त केलेली कार होती घरी -या प्रकरणात पोलिसांनी ११ जुलै २०१७ ला संध्याकाळी ५.३० वाजता एनडीपीएस पोलिसांनी रस्त्यावर आरोपीला कारसह अटक केली होती. पण, त्या दिवशी आरोपीच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यामुळे कार घरीच होती. यासंदर्भात वाढदिवसाचा कार्यक्रमाचे छायाचित्रे व व्हीडिओ तयार करणाऱ्याच्या कॅमेऱ्यात हे सर्व कैद झाले होते. ते चलचित्र व छायाचित्रे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले. यातून पोलिसांच्या कारवाईतील फोलपणा उघडकीस आला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला.

हेही वाचा -DeadBody Found Nagpur : गुप्तांगाला दोरी बांधलेल्या अवस्थेत आढळला एका व्यक्तीचा मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details