नागपूर- कोरोनानंतर म्यूकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत असताना यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनजागृती केली जात आहे. यामध्ये गावोगावी जाऊन लसीकरण, पोस्ट कोविड आणि म्यूकरमायकोसिस याची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न गावपातळीवर पोहोचून केले जात आहे. यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे 52 चमू तयार करून मोहीम राबवली जात आहे. यामध्ये दोन दिवसात शंभर गावांना भेटी दिल्या आहेत.
लसीकरणासंदर्भात भीती दूर करण्यासाठी प्रयत्न
पालकमंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेवरून ही मोहीम राबवली जात आहे. पालकमंत्री खुद्द तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाणे गावपातळीवर आरोग्य सेवा उभारून ग्रामीण भाग सक्षम करण्यासाठी लक्ष देण्याचे काम करत आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक उपकेंद्र यांना भेटी देणे सुरू केले आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये प्रचार प्रसिद्धी मोहीम सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यात जनजगृतीसोबत लसीकरणासंदर्भात भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच यात अधिकारी असो की लोकप्रतिनिधी सर्वच प्रयत्न करून ही मोहीम राबवत आहे.