नागपूर -जम्मूतील बडगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूरच्या नरेश बडोले यांना वीरमरण आले आहे. नरेश बडोले हे केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहायक उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते. अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना गोळ्या लागल्या. मात्र, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांना शोक अनावर झाला असून, आज नागपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील हुतात्मा जवान बडोले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी बडोले कुटुंबियांचे सांत्वनही केले.
गृहमंत्री अनिल देशमुखांनी हुतात्मा नरेश बडोले यांना श्रद्धांजली वाहिली.. नरेश बडोलेंबाबत बोलताना त्यांच्या आठवणींनी त्यांचे मोठे भाऊ विजय बडोले यांना गहिवरून आले. गोंदिया जिल्ह्यातील बाम्हणी या छोट्याश्या खेड्यातील नरेश बडोले हे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच व्यक्ती होते जे सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. तीन भाऊ असलेले नरेश बडोले यांच्या लहान भावाचा आधीच मृत्यू झाला होता, आणि आता नरेशदेखील हुतात्मा झाले असे सांगताना तिघांमध्ये सर्वात मोठे असलेले विजय बडोले हे भावुक झाले.
हुतात्मा नरेश बडोले यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर; आज नागपुरात होणार अंत्यसंस्कार वयाच्या 18 व्या वर्षी देश सेवेत रुजू झालेले नरेश बडोले अत्यंत अनुशासित जीवन जगायचे. नरेश बडोले यांना कोणतेही व्यसन नव्हते, 'माझा देश आणि माझे कुटुंब' एवढेच त्यांचे जग असल्याची भावना त्यांचे मोठे भाऊ विजय बडोले यांनी व्यक्त केली. नरेश बडोले यांची सीआरपीएफ मध्ये 31 वर्षांची सेवा झाली होती.
ईशान्य भारतात अनेक ठिकाणी, नंतर दिल्ली सह देशात सर्वच भागात त्यांनी कर्तव्य बजावले होते. गेले काही वर्ष ते जम्मू काश्मीर मध्ये तैनात होते. या वर्षी मार्च महिन्यात ट्रेनिंगसाठी ते नांदेडला आले होते, त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे एक महिना ते नागपूरला घरी होते. मात्र ट्रेन सुरू झाल्यानंतर कर्तव्यदक्ष असलेले नरेश बडोले लगेच कामावर रुजू झाले होते. कुटुंबियांनी कोरोनाचा प्रकोप असल्यामुळे सध्या जाऊ नका असे म्हटले होते, मात्र कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या नरेश बडोले यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता काश्मीर गाठले होते. त्यानंतर गुरुवारच्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले. जर नरेशजी थांबले असते, तर आमच्या कुटुंबावर हे दुःख आले नसते अशी प्रतिक्रिया नरेश बडोले यांचे मेहुणे राजू नंदेश्वर यांनी दिली आहे.
हेही वाचा :जम्मूत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण