नागपूर - नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामदासपेठ भागातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये अतिशय शिताफीने धाडसी चोरी झालेली आहे. एटीएम मशीनचे नुकसान न करता चोरट्यांनी 5 लाख 80 हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. ही बाब दुपारपर्यंत कुणाच्याही लक्षात देखील आली नाही. दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास एटीएम मधील रक्कम संपल्यामुळे एटीएममध्ये चोरी झाल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर लगेचचं सीताबर्डी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
5 लाख 80 हजार रुपये लंपास -एसबीआय बँकेचे एटीएम अगदी मुख्य मार्गावर आहे. त्यामुळे या भागात सदैव वर्दळ असते. शिवाय एटीएम सेंटरच्या बाजूला अनेक मोठे रुग्णालय असल्याने रात्री उशिरा पर्यंत चहल- पहल राहते. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून अगदी आरामात मशीनमध्ये ठेवलेले 5 लाख 80 हजार रुपये लंपास केले आहे.