नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. दोन वेळेला उमेदवारी मिळवून पराभूत होणाऱ्या व जनतेकडून मोठ्या अंतराने नाकारल्या जाणाऱ्या नेत्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे.
महापालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. परंतु, यानंतर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. जे काँग्रेस नेते दोनदा पक्षाची उमेदवारी मिळाल्यावरही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत, त्यांना पक्षाने यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवारी देऊ नये, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. ज्यांना आधीच जनतेने नाकारले आहे, त्यांना पुन्हा पुन्हा जनतेसमोर का पाठवता, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.