नागपूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीला सध्या सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र सध्याच्या नागपूरच्या स्थानिक राजकारणात बॅकफूटवर असलेल्या काँग्रेसने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे आहे. नवनियुक्त महासचिवांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितीन गडकरी यांच्या डोक्यात आलेल्या कल्पनेवर डोळे झाकून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र ती कल्पना कधीही सत्यात उतरत आणि पूर्णत्वास जात नसल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. केवळ स्वप्नांचा पाऊस आणि लोकांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केला असल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे आणि विशाल मुत्तेमवार यांनी केला आहे. आम्ही विकासाचे विरोधक नाहीत, मात्र आर्थिकदृष्ट्या परवडणारा विकास आणि त्यावर राजकारण केल्यास जनतेचे भले होईल, असा टोलादेखील काँग्रेस नेत्यांनी गडकरी यांना लगावला आहे.
गडकरींवर टीका
दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना नागपूरच्या जनतेला महानगरपालिका निवडणुकीत मतांचे बक्षीस देण्याचे आवाहन केले होते. त्यावर आक्षेप घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केला. चार दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरातील सुमारे डझनभर कार्यकर्त्यांना विविध पदे दिली आहेत. त्यामध्ये बहुतांश कार्यकर्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदाची जबाबदारी दिली आहे. त्या सर्वांना एकत्र घेऊन शहराध्यक्ष असलेले आमदार विकास ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासाच्या दृष्टीकोनावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.