महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गटरलाईन, नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्यांवर होणार कारवाई - तुकाराम मुंढे - nagpur city news

शहरात ज्यांनी गटरलाईनवर, नाल्यांवर जिथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Commissioner Tukaram Mundhe
आयुक्त तुकाराम मुंढे

By

Published : Jul 18, 2020, 5:26 PM IST

नागपूर - शहरातील नाले आणि गटरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की, नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्‌भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गटरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण आहे. लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत नागपूर महानागरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

नागपूर मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आवाहन...

प्रत्येक पावसाळ्यात सकल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी जात. दरवर्षी दावे-प्रतिदावे करत पावसाळा निघून जातो. मात्र, कायमस्वरूपी यावर कधीही तोडगा निघाला नाही. नागपूर शहरासाठी हा प्रश्न सध्या गंभीर असून यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या विषयाच्या अभ्यासाअंती मोठ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

हेही वाचा -इथंच मरू, पण घर सोडणार नाही; अतिधोकादायक इमारतीमधील नागरिक का घेतात अशी भूमिका?

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गडरलाईनवरील अतिक्रमण ही शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. गटरलाईनवर केलेल्या पक्क्या बांधकामामुळे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाही. त्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सुमारे २७५ पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधण्यात आले आहेत, शिवाय गटरलाईन कव्हर करणे, वऱ्हांडा बांधणे अशी कामे नागरिकांनी केली आहेत. यामुळे चोकेज काढता येत नाही. पाऊस आला की चोकेजमुळे घाण पाणी बाहेर पडते आणि ते नागरिकांच्या घरांमध्ये शिरते.

नाल्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती आहे. ७० पेक्षा अधिक भागांमध्ये नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. शहरात २२७ नाले आहेत. परंतु आता ही संख्या १३० राहिली असल्याचे तीन महिन्यांच्या अभ्यास लक्षात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून आता याविरोधात मोहिमच उघडण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

हेही वाचा -कोरोनाच्या धसक्याने माणुसकी मेली; पत्नी, मुलाने अंत्यविधीसाठी मृतदेह नेला हातगाडीवर

नागरिकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढले नाही, तर कारवाई केली जाणार आहे. नाले आणि गडरलाईनचा प्रवाह अडवण्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरु लागले आहे. अतिक्रमण हा त्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे शहरात ज्यांनी गटरलाईनवर, नाल्यांवर जिथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details